कधी तरी बोलावं आपणच आपल्याशी
कधी तरी एक संवाद साधावा आतल्याशी
तेच व्याप, तेच शाप
तेच पुण्य, तेच पाप
माझ्याच विचारांना मीच होतो पारखा
खरच जगतो का मी आतल्या सारखा?
किती वेळा रेटत जातो मी उगाच आपला मुद्दा
माझ्याच विचारांचा माझ्याच पाठीत गुद्दा
निजताना असते स्वप्नांची भीती
जागताना स्वप्ने तुटण्याची भीती
भीती...? नुसती भीती नाही..
दबक्या पावलांच्या वाटांनी गाठता येणारे
महाल रचलेत मी...
या वाटेत लागतात काही उन्मळूंन पडलेले आधारवड
तर काही घट्ट पारंब्या रोवून उभे असलेले स्थितप्रज्ञ
त्यावरिल चिमण्यांची कधी किलबिल, तर कधी आक्रोश
आधारवड, किलबिल, आक्रोश, चिमण्या... सारे मी ठरवलेले : स्मित :
माझं घेणं ना देणं त्या चिमण्यांशी ना आधारवडांशी
मला हवाय म्हणून, मी केलेला आक्रोश
मला हवाय म्हणून, मी केलेली किलबिल
आता त्याच्याशी संवाद होत नाही, वाद होत जातात
तरिही अजुन एक दिवस काळ आणून ठेवतो हातात
म्हणतो... बघ जमलं तर अजून एक दिवस प्रयत्न कर
"अरे.. काळ आहे मी
प्राण घेतो, तुझ्या सारख्या मृतात्म्यांच काय करू मी?
मला साद हवी आहे तुझी, प्राण नको"
मी हसतो... "आज टळला ना, उद्या पाहू" म्हणतो...
-सत्यजित
No comments:
Post a Comment