माझ्या कोकणची माती
जशी अत्तराची खाण
नभरस कोसळता
देते सुगंधाचं वाण
आला मेघराज नभी
धरा कुंकवाची डबी
हिरवं सोनं लेउनिया
दिसे नववधू छबी
गोड लागतो खायला
ऐन उन्हाचा व्यायला
बाळंतपण लेकीचं
लागे काळजी आयेला
आता पुरवेल लाड
लाडावेल झाड झाड
उफाळल्या दर्यासंगे
डोलू लागतील माड
हरवता पायवाटा
गावे तेरडा टाकळा
नाही कुणाचंच भय
रवळनाथाचा हा मळा
घेता पागोळ्या ओच्यात
त्यात मिळे पारिजात
मळा मेंदीभरले हात
त्यात तरारेल भात
नभं थेंबानी चुंबता
लाज लाजली लाजाळू
तिला छेडते आबोली
किती किती गं मायाळू
बघ सरेल श्रावण
मग येईल भादवा
माहेरवाशी गौवरया
बाळा गातील जोजवा
माझ्या मायेच्या डोळ्यात
कसा वाहू लागे झरा
असा पाउस पाउस
येतो कोकणच्या घरा...
-सत्यजित.
No comments:
Post a Comment