Tuesday, March 31, 2026

Wi-Fi नातं.. relationship

 What's नातं ?


नात्याची definition 

आता बदलू लागली आहे 

जवळीकतेची जागा आता

स्पेसने घेतली आहे 


भेट होण्यासाठी आधी

घ्यावी लागते डेट 

भेटीलाच आता आपण 

म्हणू लागलोय डेट


ऍडजस्ट बीजस्ट नाही

कॉमपॅटेबिलिटी हवी 

जुळत घेणं old fashioned 

Competition हवी 


आता मनातलं ओळखणं 

देखील कालबाह्य झालंय 

ते कम्युनिकेशन असतंना 

त्याला फार महत्त्व आलंय 


मॉर्डन झालं नातं 

पुरतं हायफाय झालंय 

दोन तोंड दिशेला 

सारं वायफाय झालंय 


- सत्यजित.

Tuesday, July 13, 2021

चांदणभूल - Girl in the moonlight

मुग्ध चंद्रमा नभात

यक्ष मी तू कामिनी
गगनातून अवतरली
भासली सौदामिनी

लख्ख सारे लखलखले
शुभ्र अश्व अवतरले
बरसले बघ चांदणे
तरुवरही झगमगले

पावलांचे ठसे तुझ्या
बघ पाखरते चांदणे
पदाराची झूल तुझ्या
बघ पांघरते चांदणे

तारकांच्या रांगोळ्या
रेखीयल्या नभी कुणी
झणी नक्षत्रे चितारती
कंकणांची झिणिझिणी

तम् देखील लख्ख झाले
लख्ख झाले कृष्णतळे
चमचमत्या लाटांतुन
चमचमते मीन पळे

शुभ्र पंख पसरूनी
अश्व नभी उधळले
मोत्यांचे थेंब तुझ्या
कुंतलातून ओघळले

शुभ्र अभ्र विखुरले
बघ आसमंत साजरा
पदारातून झरे समीर
चांदण्याचा उडे चुरा

लक्ष लक्ष चांदण्या
अक्ष होऊनी पाहती
लक्ष लक्ष किरणांनी
नजर तुझी काढती

एकला मी लुब्ध उभा
स्तब्ध होऊनी पाहतो
नक्षत्रेशी अप्सरेस
हेशब्द अर्घ्य वाहतो

- सत्यजित.

झिणी - त्वरित, भरभर
नक्षत्रेश - चंद्र

Saturday, July 4, 2020

पाऊससराई

सरींचा हाती हात
धारांची बांधली गाठ
थेंबांच्या अक्षता अन
थेंबांचाच आंतरपाट
विजेची रोषणाई
चौघडा गडगडाट
नभांचा झुलता मंडप
सरींचा गलबलाट
वार्‍याचे वरातीला
आणले अबलक घोडे
किरणे रुळती मानेवर
पायी तृणांचे तोडे
रानातील शीळ सखी
कानी आचरट बोले
पागोळ्या ढाळती अश्रू
मायेचे डोळे ओले
दूरदेशी गेला पाऊस
अंगण झाले सुने
पाचोळा झाले हात
कुरवाळीती लेकीचे जुने
-सत्यजित.

Monday, June 15, 2020

इतकं साधं गणित आहे

कामाला येतं त्याला देव मानणं
इतकं साधं गणित आहे
वाटल्यास तुमचेही पुजू दोनचार
तसेही इथे अगणित आहेत

इतके शहाणे झालो आम्ही
की देवालाही देतो सल्ले
इतके मोठे झालो आम्ही
की देववरही भरतो खटले

गाय पवित्र आहे कारण
तीच तर खरी कामी येते
आईचा सुकता पान्हा
तीच तर तीच दूध देते

देवाच्या लेकराला सांगा
नांगरला कुणी झुंपत का?
तिच्या लेकरा साठी आलं दूध
सांगा कोणी चोरत का?

शेळ्यांच आणि डुकराचे पिल्लू
जर नांगराला जोडता येत असेल
त्यांना ही पुजू आम्ही जर
त्यांना नांगर ओढत येत असेल

कामाला येतं त्याला देव मानणं
इतकं साधं गणित आहे
वाटल्यास तुमचेही पुजू दोनचार
तसेही इथे अगणित आहेत

दृष्टांत

अदृश्यातही तूच भासतेस
श्वासांच्या अंतरावर
अखंड चाले आपुली बडबड
भासांच्या तंत्रावर

अदृश्यातल्या तुझ्या गं गाली
पडते जेंव्हा खळी
माझी मी मलाच देतो
कचकन कोपरखळी

फसवे होते तुझे ते नसणे
हसणे कानी येते
माझे असणे तुझेच असणे
ऐसी ग्वाही देते

दिन सरला मी तुला संगतो
स्वप्न उद्याची तुला सांगतो
सांगतो मी सारे सारे
अविचल अंतरिक्ष
निश्चल वारा
अबोल सारे तारे

ग्वाही ना कुणाची
सही ना कुणाची
कुठले करार झाले
फितूर क्षणांचे
आतुर मनाचे
साक्षी फरार झाले

सारे साक्षी फरार झाले...

हे ब्रिंग इट ओन बेबी - राऊत्या

हे ब्रिंग इट ओन बेबी..

ढोरं जमली येशीवरती
चर्चा बोरिंग झाली,
चल रे रावत्या पार्टी ला मंग
पारावरती आली,
टपरी मागे रिचली क्वार्टर
रावत्या ला मग बसला स्टार्टर
चल रे उद्धव मिटवू आपल्या
सीएम मेकिंग खाजेला
पार्टीवाल्या वाल्या बोलाव माझ्या सीएम ला -४

आरं मेजॉरटी नसून
वर्षा वरती हा बघतो जायला
अन नरेंद्रला डीचवतो ते
नसतं लागुदे बोलया
आला निवडणुकीत रावत्या
कधी दांडिया खेळतुया रावत्या
युती फोडाया वर आदित्या
खाली नाचुन घेतोय रावत्या
टांगा पलटी सुटले घोडे
पवारांनी पण हाणले जोडे
गिरक्या घेतो करून मुजरा
देतो सोडून लाजेला
पार्टीवाल्या वाल्या बोलाव माझ्या सीएम ला -४


आला पवार बी रंगात
खेटून-खेटून लावतो आयटम
रावत्या भरून गल्लास
करतो खल्लास TOP to BOTTOM
हा आला पवार बी रंगात
खेटून-खेटून लावतो आयटम
भावड्या भरून गल्लास
करतो खल्लास TOP to BOTTOM
आला राज्यपालांना भेटून रावत्या
कसा लेझीम खेळतोय रावत्या
बसला दमून कडाला उद्धव
त्याला खेचून ओढतोय रावत्या
लात घालून म्हणला SORRY
उद्धव डार्लिंग आपली यारी
NCP सांगे काँग्रेस तसं
आपला हाय एक दुजेला
पार्टीवाल्या वाल्या बोलाव माझ्या सीएम ला -४



Are you ready? म्हणतो रावत्या
वर्षा वर्षा गातो,
काय बी कर पण बनव सीएम
देवेंद्र त्याला भ्येतो…
बाचाबाची घालून राडे
एक टक्के बारा घोडे
बाळासाहेबांचं ओल्डर वरजन
मागे नुसतं फोटोला
पार्टीवाल्या वाल्या बोलाव माझ्या सीएम ला -४

बोलाव म्हणजे बोलाव
हे रावत्या हिट इट रावत्या..

रावत्या… माइंड ब्लोविंग रावत्या
रावत्या… नाचुन घे रावत्या

अथांग डोळे

अथांग डोळे हसरे तरीही सांगून जाती काही
शब्दा वाचून लिहिते गाथा डोळ्यां मधली शाई

नकोच कुठला आधार कुणाचा नकोच दुबळी कुबडी
झाकले सारे मुठीत ज्या ती मूठ पडो ना उघडी

पाठीवरती थाप नको नी माथ्यावरती हात नको
उगाच उसने पुण्य नको नी व्याजावरती पाप नको

कुणीच नसते इथे कुणाचे वेळही नसते आपुली
काळाच्या जखमांवर बसते काळाचीच खपली

तरीही वाटे फुंकर एखादी झुळूक होऊनी यावी
तहानलेल्या मना शमावण्या सर एखादी बरसावी

हळवे होणे सोसत नाही मग सोसत जाते सारे
मुठीतले फुंकरण्या तिने जपून ठेवलेत तारे..
तिने जपून ठेवलेत तारे...


आपली दुःख लपवून सतत हसत राहणाऱ्या, मुठीतले तारे फुंकून सुखाची पाखर करणाऱ्या ह्या जादूगार आणि झुंझार मैत्रिणींना माझा हा मानाचा मुजरा...

सत्यजित. 

फितूर डोळे

फोटोच्या काचेतुन बघ दिसतात दोन डोळे
फोटोच्या काचेवर पण असतात दोन डोळे
फोटोच्या काचेतले बघ हसतात दोन डोळे
फोटोच्या काचेवरले बघ भिजतात रोज डोळे
काचेच्या पल्याड बघ बोलके दोन डोळे
काचेच्या अल्याड जग पोरके दोन डोळे
काचेच्या पल्याड जग मुकलेले दोन डोळे
काचेच्या अल्याड बघ चुकलेले दोन डोळे
शोधत रहातात इकडे तिकडे ओळखीच्या डोळ्यांना
फसवत जातात जिकडे तिकडे ओळखीच्या डोळ्यांना
अंधारात टक्क बघत रहातात दोन डोळे
उजेडात मख्ख बघत राहतात दोन डोळे
उजेडातलं स्वप्नांना मोडण्या आतूर झाले दोन डोळे
आपल्यावरच सूड उगवण्या फितूर जाहले दोन डोळे...

Miss call

अवेळी तिचा असा
मिस कॉल आला
अन स्वप्नांचा ताफा
सहलीला निघाला

ती रंगीत स्वप्न
जेंव्हा रंगात आली
आवेळी पुन्हा मग
मला जाग आली

कसे विचारे म्हणून
फक्त प्रश्नचिन्ह टाकले
एका अर्जाला जोडले
मी कितीक दाखले

न दाखल्यांची दखल?
न चिन्हाची चिंता?
एक गाठ सोडविताना
झाला भलताच गुंता

वाचला होता मेसेज
की नव्हता कळे ना
वा निरोपाची पावती
मिळता मिळे ना

काही क्षणातच का
इतका अस्वस्थ झालो?
ती देईल रिप्लाय
उगा आश्वस्त झालो

न कॉल येतो
न मिसकॉल येतो
मी माझ्या मनाला
मिसकॉल देतो

तेवढ्यातच तिथून
तिचा Hi येतो
'सॉरी हं चुकून'
असा रिप्लाय येतो

मिसकॉल होता मग
कसा कनेक्ट झाला?
मिसकॉलच होता
अता डिस्कनेक्ट झाला.


मंथन

विचार करायला नाही वेळ घडवून आणायचीय क्रांती आता
मिळणार नाही बऱ्या बोलानी बडवून आणायचीया क्रांती आता
तख्त बदलायचं देशाचं अरक्षणावरून मोर्चा काढायचंय
धर्मावरून लाखोली वाहायचीय जातीवरून वचपा काढायचंय
टीव्ही वरच्या बातम्या पाहून पेटून उठते अशी आग
कुणी केलं माहीत नाही शेजाऱ्यावर काढायचा राग
कोण कसले मित्र आणि कोण कुठले शेजारी
आधी माझा धर्म खरा आधी त्यांची जात खरी
प्रत्येकजण ग्रासलेला आणि प्रत्येकजण त्रासलेला
प्रत्येकजण माजलेला तरी प्रत्येकजण मागासलेला
मागासलेपण मिरवण्यात आता खरं आहे भूषण
मदत करायला गेलात तर सबळ म्हणून देतील दूषण
संभाजीच्या शिवाजीच्या विड्या फुकुन काढायचा धूर
भिमाच चाक चिखलात बोंबालत राहायचं आला पूर
आधीच छाटल्या शेंडीला चोळून ठेवायचं मणभर तूप
आग पेटवायची म्हणून फकीर जळतोय मूठभर धूप
पुजारी झालेत नेते देवाला ठेवलाय करायला प्रचार
एकाला चढवलाय सुळावर एकाला वनवासी पाचर
आता नेता सांगेल तीच आई नेता सांगेल तोच बाप
आता नेता सांगेल कोण तुम्ही नेता सांगेल कुणाचं पाप
VR गॉगल देऊन त्यांनी केलेत तुमचे उघडे डोळे
एवढं भयंकर आहे सगळं? तुमच्या पोटात तोफेचे गोळे
ते गोळे डागायला तुम्ही जन्माला घालता एक तोफ
मायेने पोसणाऱ्या आईच्या हृदयाला पाडते रोज भोक
हे जे बाळ आहे तुमचं तेही हळू हळू मोठं होईल
प्रेमाने पोसणाऱ्या आईला एक दिवस उडवून देईल
पोरके व्हाल पुन्हा तेंव्हा ते तोफा घालतील मुशीत
पुन्हा बाहेरचे येतील आणि राज्य करतील खुशीत

- सत्यजित








Monday, June 8, 2020

Social नेटवर्किंग

मेलो आहे मी
फक्त आत्मा होऊन फिरतो आहे
नाहीतर कसं काय शक्य आहे
एकाच वेळी इतक्या ठिकाणी
इतक्या लोकां सोबत वावरणं
तुमच्या दुःखात, तुमच्या सुखात
निषेध मोर्च्यांमध्ये,
निवडणुकांच्या सभांमध्ये
रोज सकाळी उजेडताना
संध्याकाळ मावळताना
दिवाळी, ईद, नाताळ,
स्वातंत्र्य साजरं करताना
हसताना, कण्हताना
रडताना, पडताना
Get well soon म्हणताना
अपघातात मरताना....
मी माझ्या आयुष्यात नसतो
तितका असतो तुमच्या आयुष्यात
कारण मी मेलो आहे माझ्यासाठी...
मी मेलो आहे तरीही अमर राहीन
माझ्या प्रत्यके ट्वीट मधून
फेसबुक मधल्या कमेंट मधून
इन्स्टाग्राम वरल्या फोटों मधून
व्हाट्सएपच्या फोरवर्डस् मधून
ब्लॉग्स वरच्या पोस्ट्स मधून
तुम्ही लिहिलेल्या RIP मधून
लाईव्ह येइनहीअधून मधून
पण फक्त तुमच्यासाठी...
कारण मी मेलो आहे... आणि तुम्हीही....

-सत्यजित.

फितूर

फोटोच्या काचेतुन बघ दिसतात दोन डोळे
फोटोच्या काचेवर पण असतात दोन डोळे
फोटोच्या काचेतले बघ हसतात दोन डोळे
फोटोच्या काचेवरले बघ भिजतात रोज डोळे
काचेच्या पल्याड बघ बोलके दोन डोळे
काचेच्या अल्याड जग पोरके दोन डोळे
काचेच्या पल्याड जग मुकलेले दोन डोळे
काचेच्या अल्याड बघ चुकलेले दोन डोळे
शोधत रहातात इकडे तिकडे ओळखीच्या डोळ्यांना
फसवत जातात जिकडे तिकडे ओळखीच्या डोळ्यांना
अंधारात टक्क बघत रहातात दोन डोळे
उजेडात मख्ख बघत राहतात दोन डोळे
उजेडातलं स्वप्न मोडण्या आतूर झाले दोन डोळे
आपल्यावरच सूड उगवण्या फितूर जाहले दोन डोळे..

बातम्या


हल्ली रोज रोज वाचायला मिळतात
नवीन नवीन बातम्या
हल्ली रोज रोज टोचायला मिळतात
नवीन नवीन बातम्या

एक बातमी ह्याला खुपस
एक बातमी त्याला खुपस
आंतरजालाच्या उकिरड्यातून
रोज नवी बातमी उपस

हल्ली रोज रोज वाचायला मिळतात
नवीन नवीन बातम्या.....

-सत्यजित.

देव मानणं

उपयोगी त्याला देव मानणं
इतकं साधं गणित आहे
वाटल्यास तुमचेही पुजू दोनचार
तसेही इथे अगणित आहेत

झाडे, नद्या, प्राणी, पक्षी,
किडे मुंग्या सगळेच देव
ग्रह, तारे, चंद्र, सूर्य
दगडा मध्येही दिसतो देव

गाय पवित्र आहे कारण
तीच तर खरी कामी येते
आईचा सुकता पान्हा
तीच तर तीच दूध देते

सांगा देवाच्या लेकराला
नांगरला कुणी झुंपत का?
लेकरा साठी आलं दूध
सांगा कोणी चोरत का?

शेळ्यांच अन डुकराला जर
नांगराला जोडता येत असेल
पुजू आम्ही त्यांनाही जर
नांगर ओढत येत असेल

ऑनलाईन बिनलाईन

सर्वपित्री अमावास्येच्या शुभेच्छांचा
मेसेज बघून मनात चर्रर्र झालं
मग मोबाईलचा चंद्र हातात घेऊनच बाहेर पडलो
GB मध्ये occupied भूतकाळ चाळला
Current stats मध्ये वर्तमान
Available space मधलं भविष्य जोखत
पितरांच Online श्राद्ध घालून मोकळा झालो ...
कावळेही online होतेच....

अंतरातली भाषांतरे

स्पर्शाची भाषांतरे ... अंतरातले अंतर संपले की स्पर्शाला अर्थ उरत नाही म्हणूनही अंतरातली भाषांतरे

चंद्रावरल्या ढगांना वारा
झुलवत राहिला रात्रभर
भुरभुरल्या ढगांचा गंध
दरवळत राहिला रात्रभर
निजलाही असता चंद्र पण
त्याच पाहणं झोपू देईना
निजला असता तोही पण
त्यांचं चांदणं झोपू देईना
बोल घेवडा अबोला
बोलत राहिला कित्ती वेळ
स्पर्शाने विस्कटणारे,
नजर मांडून बसली खेळ
नजर बोलकी
अबोल तिढा
तिढा काही सुटेना
स्पर्श अडकले वेढ्या मध्ये
वेढा काही उठेना
शहाण्या सारखे वागत राहिले
दोन्ही वेडे किती वेळ
वेडया सारखी पहात राहिली
थांबली वेळ त्यांचे खेळ

अले गंपती बप्पा मोलया....


छान छान छान देवा
छान छान छान
भली मोठी सोंड तुझी
सुपा एवढे कान ||

कधी मोदकाचे ताट
कधी दुधामध्ये साखर
कधी तुला पुरणपोळी
कधी नुसती भाकर

सगळ्यांचं सगळं कसं
गोड लागतं सांग?
तरीच तुझ्या दर्शनाला
एवढी मोठी रांग... |

कधी असतोस पिटुकला तर
कधी डोंगरा एवढा
खात नाहीस तरी तुला
प्रसाद हा केवढा?

अरे का नाही खातं काहीच
एवढं तरी सांग
हे माझ्यासाठीच मागवतोस ना
आईला तरी सांग... |

एवढा छोटा उंदीर तुझी
ओढतो कशी गाडी?
आटोमॅटिक असावी ती नुसती
Acting करतो buddy

दोस्ती असते भारी तुझी
दोस्ती आपली जान
सगळ्यांचीच काळजी घेतोस
देवा तू महान….. |

केवढी सुंदर आरास तुझी
किती हा झगमगाट
डोळे मिटून मागायचं तर
किती हा गोंगाट

पण माझी पण आहे
डेंजर दंगेखोर गँग
सगळेच आम्ही नाचतो भारी
धडांग धडांग ढ्यांग...

धडांग ढ्यांग ढ्यांग.. धडांग ढ्यांग ढ्यांग...
धडांग ढ्यांग ढ्यांग...ढ्यांग ढ्यांग...ढ्यांग ढ्यांग... ढ्यांग ढ्यांग....

ए नाचो... गणपती बाप्पा मोरया!!!

सोवळा सोहळा


जपे स्पर्शाचं पावित्र्य
असा सोवळा पाऊस
बांध आतुर थेंबाना
धुकं बनला पाऊस

मन इतकं आतूर
झाले विचार फितूर
धुकं धुकं नजरेला
पार क्षितिजा पातूर

अशा पावसाचे गडी
वृक्ष लतावल्ली झाडी
त्यांच्या पानात लपून
चाले पावसाची खोडी

झरे धुकं पानावर
थेंब दाटुनिया आले
त्याचे आतुरले स्पर्श
दबा धरून बसले

सखा वारा खोडसाळ
बघा आला मदतीला
ओल्या थेंबाच्या मिठीत
घेई पाऊस धरेला

तिज स्पर्शता पाऊस
लव हिरवी शहारे
तेंव्हा माना उंचावून
वृक्ष देतीया पहारे

फुले रानात पानात
छुपा मिलन सोहळा
तिचा तलम पदर
त्यात धुकं झाले गोळा

त्याची धुकधुक धुकं
धुकं चुंबन सोहळा
असा भामटा पाऊस
तरी किती गं सोवळा

असा भामटा पाऊस
तरी किती गं सोवळा
धुकं पाऊस पाऊस
धुकं सोवळा सोहळा..

-सत्यजित.

प्राची ते गच्ची


कल्पनेच्या समुद्रात
टाकून बसतो कवितांचं जाळ
बघूया सापडतात काही जाणिवा
काही लादबदलेले शब्द
कल्पनेचा समुद्रच मुळी
असते एक कल्पना
असते ते छोटंसं डबकं
आणि त्यात सापडतात
काही बेडूक मासे
काहींना वाटतात त्या
पावसाच्या कविता
पण जरा वाढल्या की
त्या करतात फक्त
डरांव डरांव..
डरांव डरांव..
डरांव डरांव..

आपुली कविता

लिहू द्यावी प्रत्येकाला आपुली कविता
प्रत्येक कविता तुम्हाला कळेलच असे नाही
प्रत्येक कविता तुम्हाला भिडेलच असे नाही
दिसणार नाहीत तुम्हाला कवीने पाहिलेले सूर्य
किंवा त्याने अनुभवलेला अंधकार
तो रडला असेल तेंव्हा त्याने साधलं असेल का मीटर?
तो हसला असेल तेंव्हा त्याने तोडलं असेल का मीटर?
असे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर..
 तुम्ही न वाचलेलीच बरी कविता...
लिहू द्यावी प्रत्येकाला आपुली कविता