Thursday, October 8, 2026

कोजागिरी

 

पाहिले असे तुला अन भासली कोजागिरी
मिटल्या नयनात जागुनी रात केली साजरी

तू आलीस सांजवेळी अंगणी बहरली जुई
शहारते अंगाग माझे तू माळलीस तगर जरी

पाहिले वसंत अनेक आज वसंतोत्सव पाहिला
सोहळे हे यौवनाचे तू भासशी मु़कूल लाजरी

बोलघेवड्या मनाशी अबोल गुज चालले
कल्लोळी भावनांच्या चाले तुझीच गहजरी

पाहिले नटवे गुलाब न मोहले त्यांनी मला
मनवृंदावनी बहरणारी मोहते मना मंजरी

तार तार जुळवूनी त्या आठवांचा शालू बांधला
विरले जर धागे कधी तरी उरेल गुंता भरजरी

-सत्यजित

बाळं माझ गुणाचं

 

कुणाचं गं कुणाचं ?
बाळं माझ गुणाचं

पापा देत करुन चंबू
मालिश करुन घाला शंभु

गरम गरम काढा पाणी
शंभुबाची म्हणा गाणी

फेसाच हे केवढं लोणं
पाण्यात मस्ती करतय कोण?

डोकं पुसा पदराला
पाऊ लावा अंगाला

खुदुखूदू हसतयं कोण?
गालावरच्या खळ्या दोन

छान छान कपडे घालुन
टाटा करत गेलं पळुन

लबाडं मस्ती करतय कोण?
त्याला मिळणार फटके दोन...

कुणाचं गं कुणाचं ?
बाळं माझ गुणाचं...

-सत्यजित.

तुला पाहतो मी नित निजताना

 तुला पाहतो मी नित निजताना

जसा चंद्र भासे निशा विझताना

असतिल स्वप्ने तुझ्या पापण्यांत
का उरे बेचैनी माझ्या वागण्यात

मी बेभान असतो तुझ्या चांदण्यात
की नशाखोरी असते माझ्या जागण्यात?

वाटे ठेवावे ओठ अलवार पापण्यांवर
का रुसेल चंद्र माझ्या या वागण्यावर

तुझ्या आरक्त ओठांवर विरजते पहाट
मी स्वप्नांत असता तू निजलेली दाट

हळुवार बोटांनी तुझ्या बटा सावरुन
माझी बेताल स्वप्ने मी घेतो आवरुन

मी सांग भावनांना कसे आवरावे
तुला जाग येता मी उगा बावरावे

न कळे का मी घेतो डोळे मिटुन
तू देतेस चुंबन मज निजता बघुन

तू निजता शांत मी अशी रात्र जागणार
मी का उठतो उशिरा तुज कैसे उमगणार?

-सत्यजित.

लाडी

 रामचंद्र नलावडे यांच्या लाडी

ह्या कादंबरीचा पुस्तक परिचयाशी परिचीत झालेली ही कविता.

पायी पाचोळ्याचे चाळ
पानोपानी सळसळ
तिच्या अंकुरल्या ज्वानी
कांती काचोळीचे वळ

झुळझुळता ओढा
तिने घेतला स्तनावर
अंग अंगभर काटा
शिरशिरी मनभर

ती केतकी नहाली
ओढा नागिण सरसर
धुंध गंध जलावर
ओढा वाही दुर दुर

उघड्या पाठीवर केस
कुरळ्या लता लांब लांब
तिच्या डहुळल्या कटी
तळी चंदनाचे खांब

ओल्या केसातुन पाणी
थबकले पाठीवर
जसा थेंब तेजाळतो
झुळझुळ अळवावर

काळ्या कातळाच्या पाठी
ओल्या पावलांचे ठसे
उत्तान नागीण नागवी
कोवळे उन खात बसे

-सत्यजित.

खर खर सांग देवा असं रे का केलस?

 खर खर सांग देवा असं रे का केलस?

इतके सगळे प्राणी सोडुन माणुसच का केलस?

येवढ्या सगळ्या प्राण्यांमध्ये कुणाला असते शाळा?
कुणालाच नसतो अभ्यास, नुसतं नाचा आणि खेळा

अरे, माणुस होणं म्हणजे बघ कित्ती बोर आहे
शाळा, अभ्यास, पैसे, सकसेस कित्ती घोर आहेत

चिवचिव करता पिल्लं कश्शी लग्गेच चिमणी
चिवचिव करत्या पिल्लांना देते दाणा अन पाणी

कांगारूच बाळ राहतं पोटा मधल्या पिशवीत
मग आई का नाही घेऊन जात मला तिच्या कुशीत?

कशाला हवय मोठ्ठ घर? हवे छानसे घरटे
सुगरण झुला झुलायला बांधते जसे उलटे

जेवायला नी झोपायला हवं कशाला मोठ्ठ घर?
आईबाबा ऑफिसला आम्हाला आपलं पाळणाघर

थोडा वेळ भेटतात तेंव्हा अभ्यास अभ्यास रेटतात
टाईम ईस मनी म्हणत सारखे घड्याळाला खेटतात

करिअर, सकसेस, पैसा घोर माणसांच्याच वाटेला?
आईबाबा नुसते धावतात फरफट आमच्या वाटेला

पुढल्या जन्मी प्राणी नाही, घड्याळ मात्र होईन
पैसा नाही दिला तरी थोडा वेळ मात्र देईन... देवा घड्याळ मी होईन

Tit For Tat

 

जशास तसे म्हणजे Tit For Tat

Submitted by सत्यजित on 13 January, 2009 - 02:20

जशास तसे म्हणजे Tit For Tat (टीट फॉर टॅट)
कोल्होबाची करकोचाची सांगतो तुम्हा fact (फॅक्ट)

कोल्होबा करकोचा होते सख्खे मित्र
दोघांनाही दोघांवाचुन नव्हत कुणी तिसरं

करकोचा कोल्होबाला रोज देई मासे
कोल्होबाच्या शिकारीतले खाई तो जरासे

कोल्होबाच झाल लग्न भेटली त्याला कोल्हीण
भोळ्या करकोचाला कुणी भेटे ना सोबतीण

कोल्होबाला आला होता कंटाला शिकारीचा
कोल्हीणीला म्हणाला बेत करना खिरीचा

कोल्हीण म्हणाली...
खिर खायला आले जर करकोचा भावजी
अर्धीच वाटी मिळेल एका वाटी ऐवजी

कोल्होबाला कळेना आता करावे काय?
ऐनवेळी मित्राला म्हणणार कस नाय

करकोचाला वाढली खिर पसरट वाटीत
करकोचाच्या खिर काही येईना चोचीत

मिटक्या मारीत कोल्होबानी संपवली खिर
अरे लवकर खा ना मित्रा, किती करिशी उशीर?

कोल्होबा प्राण्यांत हुशार तर करकोचा पक्षांत
लबाडीचा डाव त्याच्या आला लगेच लक्षात

हमम... आता बिचारा करकोचा काय करणार...? असा लबाड मित्र असल्यावर
पण तो पण मोठा हुश्शार हं.. तो म्हणाला कोल्होबाला...

मस्त होती खिर मित्रा आता तू ये जेवायला
मस्त ताजे ताजे मासे देतो तुला खायला

कोल्होबाला मोठी गंम्मत वाटली, अरे वाह कस फसवलं करकोचाला.. वरती हा मला मासे खायला बोलवतो आहे...आहा...आता मस्त मास्यांवर ताव मारु

कोल्हा दोन दिवस उपवास करुन...
दोन दिवस उपवास करुन गेला करकोच्याच्या घरी
मास्यांवर ताव मारण्या तयार होती स्वारी

कोल्होबाही बसला करकोचांच्या संगतीत
वाटी नाही.. ताट नाही.. फक्त सुरयां होत्या पंगतीत (!)

लांब तोंडाच्या सुरईत भरले होते मासे
सुरईत तोंड जाईना आता खावे बरे कसे ?

मास्यांचा वास आणि भुक लागली होती सडकून
हरवेपणा केला आणि तोंड पडले अडकुन.. हा हा...

मोठ्या मुष्कीलीने तोंड सुटले कसे बसे
करकोचा विचारे "मित्रा कसे आहेत मासे?"

भराभरा मासे खाउन उडाली मग पंगत
कोल्होबाच्या ध्यानी आली मित्राची गंमत

कोल्होबाला वाटू लागली स्वत:चीच लाज
मित्रा "जशास तसे" असे.. कळले मला आज ... कळले मला आज ..कळले मला आज

जशास तसे म्हणजे Tit For Tat (टीट फॉर टॅट)
कोल्होबाची करकोचाची कशी होती fact?

तर बालमित्रांन्नो कळाने ना.. आपण जसे दुसर्‍यांशी वागतो तसेच दुसरे ही आपल्याशी वागतात... आपण सळ्यांशी चांगले वागलो की सगळे आपल्याशी चांगले वागतात..

जशास तसे म्हणजे Tit For Tat (टीट फॉर टॅट)
कोल्होबाची करकोचाची अशी होती fact...

-सत्यजित.

तोच खरा मित्र...

 आता बाल मित्रांन्नो तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे... गोष्ट तशी जुनीच आहे पण गाणं मात्र नविन आहे..

ही गोष्ट आहे दोन मित्रांची, एकाच नाव होत बंडोबा आणि दुसर्‍याच पांडोबा...

बंडोबा आणि पांडोबा चालले होते वनात
जंगलातल्या प्राण्यांची भीती होती मनात

बंडोबा म्हणाला..मित्रा भितोस कशासाठी?
बघ वाघाला मारायला मी घेतलीय मोठी काठी

फुशारक्या मारीत बंडु करित होता बडबड
पण घाबरलेल्या पांडुची वाढलेली धडधड

उं.... ऊ,,,,, (जंगलातील वार्‍यचा आवाज)....

होती एकाकी वाट, होत जंगल घनदाट ! (बापरे!)
आता बंडोबाची पांडोबाची लागली पुरती वाट

किर्र...कुरर्र.. किर्र... कुरर्र..
व्हांव...हूऊ हू.... घ्रॉंव... ड्य्रॉव ड्य्रॉव...

बेडकाच्याही ओरडण्याला दोघे होते घाबरत
एकमेंकाचा धरत हात... निघाले ते चाचरत

दोघांना घाबरायला आता .. लागत नव्हत कारण
विर बंडोबाच्याही... बसली पाचावर धारण

बापरे!...
दोघांच्या समोर एक अस्वल आलं मोठ (व्हांयव...)
उरल सुरल अवसानही गळुन गेलं होत Sad

अवती भवती सगळीकडे किर्र-गर्द झाडी..
इकडे पळु? तिकडे पळु? झाली पळता भुई थोडी.... झाली पळता भुई थोडी

घाबरलेला पांडोबा बसला झाडावर चढुन
मित्रा हात दे म्हणाला, घेईन तुला ओढुन

पांडोबाचा धरुन हात बंडोबा वर चढला
बंड्याच्या धांधलित पांड्या खाली पडला

(पांडोबा) पडलो पडलो बंडोबा.. आता हात दे मित्रा
(बंडोबा) अस्वल धरेल ना मला, मी तर तुझ्याहुन भित्रा

पुन्हा झाडावर चढाया उरली नव्हती शक्ती
धीर धरत पांडोबाने शोधुन काढली युक्ती

मेल्याच नाटक करत धरुन ठेवला श्वास
अस्वल निघुन गेलं... नुसताच घेउन वास

अस्वल जाताच बंडोबा उतरुन खाली आला
(बंडोबा)तुला जिवंत पाहुन मित्रा आंनद आहे झाला

पण असं कसं मित्रा तुला अस्वलानी सोडलं?
सांग तुझ्या कानामध्ये ते अस्वल काय बोल्लं?

(पांडोबा..)
अस्वलानी सांगितला कानात माझ्या मंत्र
"अरे कामी येई संकटात तोच खरा मित्र"... मित्रा तोच खरा मित्र...

-सत्यजित.