Wednesday, March 26, 2008

छाया चित्रकाराची

एका छायाचित्रकाराचे मनोगत टिपण्याचा एक प्रयत्न...

निर्मात्याने निर्मिलेली प्रत्येक गोष्ट आत्मियतेने पहाणारा मी
कुणी म्हाणतं ढोंग आहे
कुणी म्हाणतं व्यासंग आहे
कुणी म्हाणतं कुतुहला पोटी सारं
कुणी म्हाणतं चार दिवसाच वेड सारं
कुणी म्हाणतं की कुणाच्या दुःखाच भांडवल करणारे आम्ही
तर कुणी म्हाणतं कुणच्या हसर्‍या आठवणी विकणारे आम्ही
तरीही ह्या सर्वां पासुन अलिप्त रहाणारे आम्ही
आम्ही प्रेमात पडतो पण प्रेमात अडकत नाही
कारण आम्ही नुसत बंदीस्थ करतो कधीच कुणाला अडकवत नाही
कधी जे दिसतं ते टिपत जाणं असत
तर कधी जे दिसत त्या पलिकडे जाउन पहाणं असत
कधी खोल खोल गाभार्‍यात जाणं असत
तर कधी उंच उंच आभाळातून पहाणं असत
कधी जे दिसत ते तसच असत
कधी जे दिसत ते तस नसत
तर कधी ते असं दिसत हे दाखवण असत
तर कधी न दिसलेल नुसत भासवण असत
म्हंटल तर अर्थशुन्य
म्हंटल तर भावपुर्ण
म्हंटल तर अस्तित्वहीन अर्थ
म्हंटल तर कोर्‍याकागदाहुनही व्यर्थ
पण, इथे प्रत्येक अनर्थालाही एक अर्थ असतो
तर कधी प्रत्येक अर्थात एक अनर्थ असतो
कधी मलाच कळत नाही की हे काय आहे?
कधी हसू टिपण तर कधी अश्रू टिपण
कधी प्रकाश टिपतो तर कधी अंधार
कुणी म्हणत अंधार नाही टिपता येत
पण खर तर उजेड नाही टिपता येत
आम्ही टिपतो तो अंधार,
कधी रंगीत तर कधी बेरंगी
पण असतो तो फ़क्त अंधार
म्हणुनच कदाचीत ह्याला ’छायाचित्र’ म्हणत असवेत...

-सत्यजित

Sunday, March 16, 2008

गोरापान चांदोमामा (बालकविता)

का गं आई चांदोमामा
असतो गोरा गोरा पान?
शुभ्र ढगांच्या फेसात तो
आंघोळ करतो छान..

उंच उंच ढगात
त्याचा बाथटब असतो
दिवसभर शुभ्र फेसात
आंघोळ करत बसतो

त्याची झाली आंघोळ की
ढग काळे काळे होतात
भराभर पाणी ओतुन
चांदण्या त्यांना धुतात

पाऊस पडुन गेला की
कसं स्वच्छ स्वच्छ वाटतं
मग चांदण पण पावडर लावुन
छान छान नटतं.

-सत्यजित.

तू जाताना...

मातलेला चंद्र आहे चांदणे विझवून जा
चेतल्या स्वप्नांस माझ्या तू जरा निजवून जा

भांडते आकाश सारे त्या जरा रिझवून जा
रातीच्या गर्भात उद्याचा तेजपूंज उजवून जा

गोंदल्या क्षणांस पुन्हा एकदा गिरवुन जा
वाहत्या जखमांवरी हात प्रिये फीरवून जा

काळजातील वेदनांना तू सुरांनी सजवून जा
बहकाल्या गात्रांत माझ्या कैफ़ तुझा उरवून जा

Wednesday, March 12, 2008

आई ताप आलाय.... (बालकविता)

मला जे दिसत
ते तुम्हाला पण दिसत का?
कळोखात न दिसणार भुत
तुम्हाला पण बघुन हसत का?

मी नाही घाबरत त्याला
तेच घाबरत मला
येवढी जर हिम्मत असेल
तर उजेडात ये म्हणाव त्याला

तुम्हाला माहित्ये का?

वर वर ढगात
एक लांब दाढीवाला असतो
गडगड गडाड आवाज करत
मोठ्यांदा हसतो

"मी नाही घाबरत तुला"
मी त्याच्यावर ओरडतो
तो मला घाबरुन त्याची
चड्डीच ओली करतो

ए पावसात काय भिजताय
तो वरतून सू सू करतोय
ताप आलाय मला म्हणुन
मी तुम्हाला सावध करतोय

श्शी.. आत्ता जाईल ताप
मग उद्या पुन्हा शाळा
तापाला म्हंटल रहा जरा
तर म्हणतो आलाय कंटाळा

उन्हाळ्याच्या सुट्टीत येतोस
तेंव्हा कसा रे रहातोस?
शाळा असलीकी मात्र
लगेच निघुन जातोस

बघतोच तुला ह्या सट्टी मध्ये
यायलाच देणार नाही
गार पाणी, आईसक्रीम, गोळा
काहीच खाणार नाही

श्शी.. कित्ती आवाज करतायत मुल
जरा आराम देत नाहीत
शाळेतल्या टिचर ह्यांना
खुप आभ्यास का देत नाहीत?

तस मला बरं वाटतय
पण आई नको म्हणेल
आता खेळायला जातो म्हंटल
तर उद्या शाळेत जा म्हणेल

जाऊंदे ना तसे पण सगाळे
सुस्सू मध्ये खेळ्तायत
शी.. सुसू मध्येच उड्या मारतायत
सुसू मध्येच लोळतायत.....

शी अले ए..
ऐकत नाही??
तिकडे पान्यात सापए..
आणि टिव्ही वर स्पाईडरमॅन पण लागला आहे.. मस्त..

-सत्यजित

माझी मुंबई... एक जंगल

नजर जाईल तोवर
पसरलेल जंगल
विटा दगडांच्या समाधीत
विसरलेल जंगल
हिंस्र श्वापदांना मुक्याने
झेलणार जंगल
काळाजावर आघात
पेलाणार जंगल
भजेल त्याला नित्य
पावणार जंगल
धगधगत्या रुळांवर
धावणार जंगल
जुन्याच प्रश्णांच्या थारोळ्यात
लोळणार जंगल
आपल्याच धुनीत सदैव
पोळणार जंगल
विवीध रंगाच्या दिव्यानी
सजलेल जंगल
धुरांची शाल पांघरुन
निजलेल जंगल
सचेतन शरिरात अचेतन मनं
गाढलेल जंगल
शेत खाणार्‍या कुंपणानी
वेढलेल जंगल
भिषण स्फोटाने बिचारं
बावरलेल जंगल
आपल्याच हाकेने आपणच
सावरलेल जंगल
तुमच्या आमच्या दु:खाने
कुढलेल जंगल
तुमच्या आमच्या संगे
रडलेल जंगल
तुम्हा आम्हा सगळ्यांनी
वाढलेल जंगल
तुम्हा आम्हा सगळ्यांनी
तोडलेल जंगल...

सगळ्यांच असुनही माझं माझं जंगल...

-सत्यजित

Tuesday, March 11, 2008

गोंदण

अजुनही ह्रुदयात गोंदली आहे तुझी नी माझी पहीली भेट
बावरलेली नजर तुझी ह्रुदयात शिरली होती थेट
मनात दाटल्या भावनांच ओठी येता झाल गाणं
ह्रुदयानी छेडल्या सुरांच मनात असच तरळत रहाणं
वाटल होत तेंव्हा तुझे हात हाती घ्यावेत
वाटल होत तेंव्हा तुझे हात मुठीत घट्ट धरावेत
मग म्हंटल जाउ दे! नाहीच भरल हातानी मन
तर ह्रुदयानी काय करावे?
माझं ह्रुदय म्हणता म्हणता उनाड पाखरु झाल
तुला भाळी आट्या बघताच पुन्हा भानावर आल
आता तुझी नजरही जरा सावरली
मीही माझी स्वप्न आवरली
तु 'येते हं' म्हणताच माझी स्वप्न बावरली!
’येते हं’ या शब्दांनी सारं आकाश भरुन गेलं
’येते हं’ या शब्दांना आज उभं तप सरुन गेलं
तु ’येते हं’ म्हणुन पुन्हा कधीच आली नाहीस
तुझी नी माझी राहीली भेट पुन्हा कधीच झाली नाही
आजुनही मनात सल आहे तुझी मला साथ नाही
मीही खुळ्या मनाला समजवतो
एकदा गोंदलं कधी जात नाही..

Thursday, March 6, 2008

आज्जीचा बत्तासा.. (बालकविता)

आ़जी ने दिला बत्तासा वर आभाळात फेकला
आभाळातच अडकून त्याचा चांदोमामा झाला

वाटत रोज चोरुन बप्पा, माझा बत्तासा खातो
तरीच रोज चंद्र अस्सा छोटा छोटा होतो

हळुहळू करत त्याने एकदा सगळाच गटम केला
थांब म्हणालो, तुझ नाव आता सांगतो आजीला..

आजीच नाव घेताच एकदम घेला घाबरुन
देईन म्हाणाला बत्तासा पण थोडा थोडा करुन

बप्पा बिच्चारा एकच बत्तासा पुरवुन पुरवुन खातो
थांब म्हणालो आज्जीकडुन तुला पण एक देतो

:( प्रसाद आहे म्हणाली आज्जी एकच बत्तासा मिळेल
पण मी बप्पासाठीच मागतोय ना, पण ते तिला कसं कळेल?

आज्जी म्हणाली..
अर्धा पण खात नाहीस पण रोज दोन बत्तासे मागतोस
तुझा उष्टावलेला अर्धा मग बप्पा समोर का ठेवतोस?

अगं आज्जी..रोज चंद्र खाण्यापेक्षा बप्पाला बत्तासा खाऊ दे
मला म्हातारीला फसवतोस काय? चल मला जाउ दे..

आज्जी देत नाही म्हणुन हा रोज चंद्र खातो
नाव सांगु का आज्जीला? म्हणताच सगळा परत देतो... :))

हा.. हा घाबलला...
-सत्यजित