Wednesday, July 2, 2008

चांदुल्याला घातल ढगांच टोपडं (अंगाई)

चांदुल्याला घातल ढगांच टोपडं
आभाळाची शाल पांघरुन झोपी गेलं बापडं

चांदुल्याच्या शालीवर लुकलुक तारे
टकामका पाहती चांदुल्याला सारे
दृष्ट लागेल असं माझ्या, चांदुल्याच रुपडं

चांदुल्याचे लाड बाबा करती आती
आत्या, मामा खेळणी आणती किती
कुणी आणलं असवल, नी कुणी आणली माकडं

तुझ्या सवे खेळताना वाटते बरे
सर्व नित्य चिंतांना विसरती सारे
तुझ्या सवे झालं बघ, घर सार बोबडं

चांदुल्याला बर नसता आई गं जागते
पदर पसरुन देवाकडे आजी गं मागते
आजोबाही घालती देवा कडे साकडं

बघता बघता माझं बाळ मोठ होईल
बंगला नी गाडी काय विमान ही घेईल
आत्ताच होउ लागल बघा, झबलं ही तोकडं

उत्कर्षाला असावी संस्कारांची साथ
आपण ही व्हाव कुणा आधाराचा हात
येवढच माझ मागणं, आज गं देवाकड

चांदुल्याला घातल ढगांच टोपडं
आभाळाची शाल पांघरुन झोपी गेलं बापडं

चांदुल्याच्या शालीवर लुकलुक तारे
निजता गं चांदुल्याला झोपी सारे
बोलू नका कुणी आता बाळ आहे झोपल...

-सत्यजित.

No comments:

Post a Comment