Thursday, September 4, 2008

बप्पा दे गोड चॉकलेट सारखं सुखं....

बप्पा तू करतोस खरच आयडीया किती मस्त
येवढ्या सगळ्यां गोंगाटात बसतोस कसा स्वस्थ?

आम्ही काही मागता टिचर आमच्यावर ओरडतात
वन बाय वन म्हणतं, सगळ्यांना रांगेत उभे करतात

हं... तरीच तुझे सुपा येवढे मोठ्ठे मोठ्ठे कान
एकदम सगळ्यांच एकुन घेतोस देवा तू महान

कशी मस्त आईडिया तुझी, तुला केवढी मोठ्ठी सोंड
कानात गंम्मत सांगायला, न्यायला नको जवळ तोंड

लाल लाल शेला छान, पिवळं धोतर आहेस नेसलस,
अरे वाजेल ना थंडी तुला, तू शर्ट का नाही घातलस?

आजींनी विणलं स्वेटर त्यावर मस्त जॅकेटचा ड्रेस
देतो नविन जिन्स पँट वाटल्यास त्यावर धोतर नेस

किती घातलेस दागिने आणि किती घातलेस हार?
सगळ्यात दुर्वा नी जास्वंद, तुला आवडत ना फार

कुठे मोदकांच ताट, कुठे शि-याचा टोप
काहीच न खाता तुझं वाढलं कसं पोट?

आई सारखंच तुझही मी खाता का पोट भरतं?
आइच म्हणते तुझ्या चरणी सर्वाच दु:ख हरत

बप्पा मला सांग जरा हे दु:ख काय असतं
कान, नाक, गुढगा, पोट नक्की काय दुखतं?

काहीच नको दुखायला, कुणा देउ नकोस दु:ख
शहाणा कर सगळ्यांना, दे चॉकलेट सारखं सुखं

बप्पा दे गोड चॉकलेट सारखं सुखं....

-सत्यजित.

No comments:

Post a Comment