Sunday, September 14, 2008

हर्षे स्विकारावी भक्तांची सेवा

जय देव जय देव जय गणपती देवा
हर्षे स्विकारावी भक्तांची सेवा ||धृ||

लंबोदर सुंदर पाषंकुशधारी
वरदहस्ते मुर्ती मुषकाची स्वारी
नागेन्द्राचा विळखा धारूनिया उदरी
रत्नजडीत मुकुट शोभतो शिरी ||१||

सर्वांग सुंदर देवा गणराया
आदिशक्तीशाली गौरीच्या तनया
भक्तांची दु:खे नेशी तु विलया
तारिशी सारी विघ्ने करूनी तू किमया ||२||

कार्यारंभी पूजन तुझे करावे
निर्विध्न तू कार्य सिद्धीस न्यावे
संकट येता देवा मज तू तारावे
अनंतरूपे दर्शन आम्हा तू द्यावे ||३||

त्रैलोक्याचा देव देवांचा त्राता
दीनांचा उद्धार, ज्ञानाचा दाता
बुद्धीचा तू देव विद्यागणनाथा
सद्भावे ठेवितो तव चरणी माथा ||४||

तू कोटी सूर्य तेज निर्गुण आकार
ज्ञानियांचा राजा सद्गुण साकार
जय जय श्री गणराज मज तू पावावे
मानून घे ही सेवा केली मनोभावे ||५||

जय देव जय देव जय गणपती देवा
हर्षे स्विकारावी भक्तांची सेवा ||धृ||

~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~~.~
हे अजून एक कडवं .. बप्पांच्या निरोपाचं

आनंदे उत्सवे राहिलासी देवा
पुढच्यावर्षी लवकर येशील ना देवा
काही झाले अनुचित देवा क्षमा असावी
तुझी सतकृपा सदैव आम्हावरी व्हावी || ६||

No comments:

Post a Comment