Wednesday, December 19, 2012

व्यसनी

अजुनही आपसूक वळते


नजर त्या खिडकी पाशी

फरक इतकाच की

आता प्रश्न पडतात

तेंव्हा वादळं उठायची



आता नकोशी उत्तरं असलेले

नको ते प्रश्न

तेंव्हा हवीहवीशी असणारी

नको ती वादळं...



तशी खिडकी सामान्यच

पण ह्या खिडकीत, "भुरळ" होती

पाडगावकरांच्या कवितेतला बकूळ होता

नाधोंच्या कवितांतला पाऊस होता

बोरकरांच्या कवितांतला 'पहिला' रोमांस होता

ग्रेसांच्या कवितांतली हुरहुर होती

त्या पलिकडे जाऊन

शब्दां शिवाय मनात रेंगाळत

रहाणारी 'एक' कविता होती



काही गोष्टी सवयीने

किती सवयीच्या होतात

तर काही गोष्टी

सवयी लावून जातात



मी इतकी वर्ष बघतो आहे

त्या खिडकी कडे

पण कधीच थांबलो नाही

पण...काल अचानक मनात विचार आला

की खिडकीतुनही कोणी बघत असेल का

इतकी वर्ष...?  मी थांबायची वाट पहातं...



मगाशी म्हंटलं ना..

नकोशी उत्तरं असलेले... नको ते प्रश्न



-सत्यजित.

Wednesday, December 12, 2012

सचिन तेंडूलकर- The God Of Cricket

सचिन ने शतकी शतक केलं होतं तेंव्हाची ही कविता... Sachin Ramesh Tendulkar -God of cricket...

आज महाराष्ट्राचा सह्याद्री
हिमालयाहून उंच झाला
फक्त पाच फूट पाच इंच
हाईट दिली आहे त्याला

तू टोलवलेला चेंडु जेव्हा
सीमेपार जातो
तुझं कौतूक पाहायला
प्रत्येक डोळा आई होतो

दुडूदूडू पावलांची चिंता
फक्त आईच्या मनाला
सारा देश तुझी आई होतो
तू लागलास की खेळायला

पदकांचेही शतक
शतकांचेही शतक
कौतूक तुझं पहातं रहावं
तू खेळत रहावस अथक

कुणी खुळे विचारतात
देव कधी का पाहीला?
अहो परवाच नाही का...
टीम इंडियाने त्याला विश्वचषक वाहीला

  -सत्यजित.

Tuesday, November 13, 2012

"शुभ दिपावली"



क्षितीजाच्या मुठी हळुवार उघडते
अन होते एक सकाळ
मुठीतला सूर्य हळूवार उधळते
अन होते एक सकळ

सूर्यही अजुन दवांना लपेटून
क्षितीजाच्या दुलईत लपतो
गुलाबी स्वप्नांची तुटलेली रे़कॉर्ड
मी पुन्हा प्ले होते का बघतो

ओल्या केसांनी वावरत असतं
कुंकवान भरल कपाळ
सूर्यही फिका चंद्रही फिका
नक्षत्रांनी उजळली सकाळ

शीळ घालता मस्तवाल वारा
माझ्या खिडकीशी येउन अडतो
त्यालाही ठाव ती सुकवताना केस
प्राजक्ताचा सडा पडतो

रंगानी सजली, रांगोळी भिजली
दिव्याची ज्योत न्हाऊन बसली
हिरवा चुडा अन हळद ओली
नववधूशी भासे झेंडूची माळ

नविन कपड्यात अवघडला कंदील
चूळबूळ करत असतो
आईची हाक आणि बांबाचा धाक
नसला तरीही मी ऊठतो

मी भरभर उठतो, सरसर आवरतो
हात जोडण्या आधी घरी फोन करतो
आई तितक्याच कौतूकाने बघते
अन हसते एक सकाळ

"शुभ दिपावली"
शब्द औक्षण करतात,
नभीचा सुर्य मुठीत कोंबते
पुन्हा हसते एक सकाळ..

-सत्यजित.

Friday, August 17, 2012

विडंबन - हाची सोनियाचा मनु

प्रेरणा : आजी सोनियाचा दिनु


हाची सोनियाचा मनु
वागे श्वानापरी जणू
दारी बांधीला रे... दारी बांधीला रे

सहाय्य मड्डमकरी
चाले तिच्या हुकमावरी
दारी बांधीला रे... दारी बांधीला रे.. हाची सोनियाचा..

मॅडमचे मन मोही
पाठीघाले देशद्रोही
हा ही वाहीला रे .. हा ही वाहीला रे

घडता भ्रष्ट उठाठेवी
कानावर हात ठेवी
नाही राहीला रे.. नर नाही राहीला रे.. हाची सोनियाचा

असला षंड सरदारु
आत्मघाती बुच मारु
नाही पाहीला रे... नाही पाहीला रे.. हाची सोनियाचा

कृपा करी भरणाभरु
पाप रक्कमा ठेवी करु
हा ही वाहीला रे .. हा ही वाहीला रे .. हाची सोनियाचा

हाची सोनियाचा मनु
वागे श्वानापरी जणू
दारी बांधीला रे... दारी बांधीला रे

- सत्यजित.

नभव्याकुळ

लाडानं पोसणार्‍या

मायेच्या सुरकुत्या
आता भेगा झाल्या
आणि पाऊस फक्त
उरला कवितां पुरता


पदराचा ओचा आणि
धोतराचा सोगा
असतोच मुळी साऊंडप्रूफ
नभव्याकुळ डोळे
 झालेत आता वॉटरप्रूफ


अँटी व्रिंकल्स अन
मॉईश्चराईजर्स
वापरणार्‍यांचा दावा
भेगांच काय येवढं?
क्रॅक क्रीम लावा !


तुमच्या व्रिंकल्स येवढ्या
भेगा काही खोल नाहीत
बाटली शिवाय पाण्याला
नी कुंडी शिवाय मातीला
तसंही इथे मोल नाही


कोण म्हणतो पाणी नाही?
पंधरा रुपये लिटरने
अख्खा समुद्र कसा
काय घाण करतात
ही शहरातली गटारं?


पाऊस आता फक्त
कवितेचं पीक घेतो
कधी रोमँटीक तर
कधी ओलेत्या
कल्पनांची भीक देतो.



-सत्यजित.

Friday, June 15, 2012

अनावृत्त पाऊस

ती खिडकीतुन बघता पाऊस

पाऊस काचेवर रेंगाळला

नभ गुरगुरता त्याचे वरती

पाऊस किती बरं ओशाळला



नभास दिसते नुसती खिडकी

अन दिसते ना काही

स्पर्शावे तिने थेंबास म्हणोनी

पाऊस रेंगाळत राही



कोपे नभ ओढी पाठीवर

लकलकता आसूड

लखलखली ती विजेहून

पाऊस वेडा अल्लड हूड



नभास आले कळोनी सारे

तिरक्या केल्या धारा

काचेवरुनी थेंब झटकण्या

घोंगावत ये वारा



फरफरटले ते काचेवरती

तरी न सोडला धीर

वादळात त्या उभे ठाकले

ईवलेसे प्रेम वीर



काचेवरती आर्त थाप

पण तिला कसे कळावे?

थेंबांचे न दिसती अश्रू

मग कोणी कसे पुसावे?



काय भासले तिला कळे ना

ठेवले अधर काचेवरती

गहिवरला कोसळला पाऊस

पुलकित झाली धरती



-सत्यजित.



Monday, May 28, 2012

बादल के बंद लिफाफे में

बादल के बंद लिफाफे में
कहीं उसका खत तो नहीं
पता नही लब्स गिले है या सुखे?
भेजे होंगे उसने हजार सपने और कईं ख्वाईशे 
या भेजी होगी उसने झिलमिलाती हुयी धुप
या फीर आसूंओं की गिली बारीश
लिफाफा खोलतेही गिला होना तय है
बस सोच रहा हूं के किस को साथ ले लूं
दिल को या दिमाग को?

बादल के बंद लिफाफे में
कहीं उसका खत तो नहीं...


-सत्यजित.

Monday, May 14, 2012

मै कभी बतलाता नही....

'आई', आई म्हणजे उगम, आई म्हणजे निर्माण, आई म्हणजे ओळख, आई म्हणजे संरक्षण, आई म्हणजे जिवन, आई म्हणजे अभय.


जिच्याशी जोडलेली नाळ तुटली की बाकी नाती जन्माला येतात ती आई. प्रत्येक जन्मल्याला येणर्‍याला बाय डिफॉल्ट आई ही असतेच. कुठल्याही गोष्टीचा उगम किंवा निर्माण करण्याची शक्ती म्हणजे आई.

तुमच्या साठी मी 'माझी आई' ह्या वर मी एक निबंध लिहू शकेन पण माझ्या स्वतःसाठी म्हणुन माझ्या आई बद्दल लिहायच झाल तर मात्र एक प्रबंध लिहावा लागेल. माझी आई कशी आहे, माझ्या आई माझ्यासाठी काय करते कींवा तिने माझ्यासाठी काय केलं ह्याचा विचार करणं म्हणजे फुटपट्टी ने पृथ्वीच्या व्यास मोजायला निघण्या सारखं आहे. आई बद्दल काही लिहणं म्हणजे मला बाळबोध वाटतं. तिने माझ्यासाठी काय केलं ह्याची कल्पना करण देखिल माझ्या अवाक्या बाहेरच आहे, म्हणुन मी माझ्या आईला डिस्क्राईब करुच शकत नाही. माझ्या साठी आई म्हणजेच मी आहे, ती अंनतरुपी आहे, ती ह्या चराचरात आहे, ती माझं अस्तित्व आहे आणि मी तिच अस्तित्व. मी माझ्या आईच अस्तित्व आहे ह्या विचारानेच मला शद्बात न सांगता येणारा आनंदानुभव मिळतो. 'अहं ब्राम्हास्मी' मध्ये जो आनंद आहे किंवा जी भावना आहे त्यापेक्षा कईक पटीने मला आनंद मी माझ्या आईचच अस्तित्व आहे हे म्हणण्यात आहे. आई म्हणजे मीच, तिच्या पासून वेगळा झालेला मी एक भाग. माझं ब्रम्ह म्हणजे आई, ह्या ब्राम्हाच चलत बोलतं मुर्त रूप म्हणजे आई. आई म्हणजे नुसत ब्रम्ह नाहीतर ती विष्णू देखिल आहे, माझा सांभाळ करणारी तीच आहे. ह्या संपुर्ण विश्वाच एकसंघ रुप म्हणजे माझी आई, एक चालतं बोलतं विश्वरुप म्हणजे आई.

मी लहानपणा पासुनच आईवेडा आहे, मी तिच्या भोवतीच घोटाळायचो, अगदी मोठा होई पर्यत मी कधी आई शिवाय राहीलो नाही. अजुनही तिच्या पसुन दुर रहायचा विचार केला की ते अनसिक्यूर फिलींग मला अजुनही येत. पण आता मी मोठा झालो तेव्हा ते फिलींग हे पोरकटपणाचे द्योतक आहे आणि मी पोरकट नाही असे स्वतःला समजवतो. मी "आईचा लाडका" असं माझा भाऊ म्हणतो मला नेहमी चिडवायचा (अजुनही त्याला असच वाटतं) आणि मी "आहेच मुळी' म्हटल की स्वतःच रडवेला व्हायचा आणि हे सांगायला तो आईकडे जायचा. मग आईची जी तारांबळ उडायची ते पाहुन मला वाटयच की मीच खरा आईचा लाडका आहे आणि म्हणुनच तिची तारांबळ उडते. पण आता कळतं एकच सफरचंद दोघाना हवं तेही अख्ख, वाटणी नको म्हंतल्यावर मग आईची तारांबळ उडणारच. पण तेही साध्य करण्याची किमया ही आईच जाणो.

साला, पुरूष म्हणुन जन्माला आल्याच एकच दु:ख आहे की आपल्याला आई होता येत नाही, अभागी रे अभागी. म्हणुनच स्त्री म्हणजे आई, माझी अस नाही पण कोणची ना कोणाची आई होणं स्त्रीलाच शक्य आहे. किती ते भाग्य.. तरी स्त्री जन्माला दोष देतात स्त्रीया.

पण खरा प्रॉब्लेम ईथेच आहे. स्त्री म्हणजे 'आई', मग हट्ट पुरवायला, रागवायला, मला हे असच हवं म्हणुन त्रास द्यायला आईच असते, म्हणुन मग त्याग करावा तर स्त्रीने असा आम्हा पुरषांचा बाय डिफॉल्ट समज आहे, नाही पक्की धारणाच आहे.

मला लहान मुलं आवडतात कारण त्याना फक्त आई असते, आपण जसे मोठे होतो तसे बाकी ईतर गरजांसाठी आणि अनेक इतर नाती निर्माण होतात. पण मुलांना फक्त आई असते ती असली की आणि कुणाची गरज नाही. त्यात मला मुली जास्त अवडतात असं माझ्या 'सौ'च मत आहे. म्हणजे तशा अर्थाने नाही हो... आमच्या घरातल्या पिल्लावळी मध्ये मी मुलींचे जास्त लाड करतो अस तीच मत आहे. कदाचीत खरही असेल मुली जास्त बदमाश असतात, मुलं नुसती खोडकर आणि मस्तीखोर एकंदरीत, मुली लाघवी आणि मस्का मारु असतात. आपले लाड कसे करुन घ्यायचे हे मुलींना जस्त माहीत असतं, मुलं त्या मानाने साळसूद असतात. पण विचार करता मुली ह्या उद्याच्या "आई" असतात आणि उद्या त्यांना बरच सोसायच आहे, हट्ट करण्याच त्यांच हेच वय आहे, उद्या हट्ट पुरवण्याची जबाबदारी आपसुक त्याच्यावर येणार आहे. कदाचित म्हणुनच त्यांचे जास्त लाड करावेसे वाटत असतिल. उद्या लाड पुरवतो म्हटलं तरी, उद्या एका 'आई'चे हट्ट मी काय पुरवणार, बापरे तेवढ सामर्थ्य नाही रे आपल्यात. म्हणुन ह्या सर्व आयांचे हट्ट आताच पुरवायला हवेत. माझा एक हट्ट असतो त्यांच्या कडे की मनाने आणि शरीराने आत्ताच सक्षम आणि बलवान व्हा... माझा हा एक हट्ट पुरवा, मी तुमचे सगळे हट्ट पुरवायला तयार आहे.

मी हिटलरच्या एका गोष्टीचा प्रचंड चाहता आहे, त्यानी म्हणे रुल काढला होत की प्रत्येक तरूणीने एक वर्ष शेतात राबायला हवं. का तर त्या मुळे त्या सुदृढ होतीत आणि पण येणारी पिढी सुदृढ होईल.

'आई' ह्या शब्दाचा खरा अर्थ कळालेला येवढा देशवेडा आणि येवढा द्रष्टा राजकारणी कसा काय येवढा कूप्रसिद्धीस गेला हे कोडंच आहे. (त्याला कदाचीत जाणुनबुजुन कूप्रसिद्ध केलं असवा असा मला दाट संशय आहे)

बघा मी म्हंटल होत ना आई म्हणजे विश्वरुप आहे काय आणि किती लिहाव...

कीती काही लिहण्या सारख आहे, धरती, माती, नद्या ह्यांना आपण आई का संबोधतो? लागलं, पडलो की 'आई ग्ग' का म्हणतो? अजुन काय नी काय नी किती लिहावं...

आई म्हंटल की हळवं होता येतं पण बाबा म्हंटल की नाही होता येत असं का?.. आई म्हणजे धरती आणि बाबा म्हणजे आभाळ...

हॅप्पी मदर्स डे.. मातृदिनाच्या शुभेच्छा... हे ईग्रजी डें ना देखिल महत्व आहे. आज पहील्यांदाच मी मदर्स डे म्हणुन काही लिखाण केलं आहे. आईशी तर रोजच बोलतो आणि आई बद्दल काय वाटतं हे सांगायला मदर्स डे हवा कशाला..,? मी नाही विश केलं आईला, ना ग्रिटींग... हे लिहील आहे तुमच्यासाठी...

प्रसून जोशी ने काय पर्फेक्ट लिहीलं आहे ना?..

मै कभी बतलाता नही...
कितना प्यार तुझसे करता हूं मै मां..... तुझे सब है पता... है ना... मेरी माँ...

Tuesday, March 27, 2012

मै हूं जुग-जुग जुग-जुग जुगनू - सैल वेणीतल्या स्वैर त्रिवेण्या

सैल वेणीतल्या स्वैर त्रिवेण्या...

खिडकीच्या बारांवर दवबिंदूंच्या ओळी
किरणांनी गाठले पहाटेच्या वेळी
मला वाटलं काजवे थिजलेत...

==================================

आभाळभर लूकलूकते पसरले तारे
तारे नाहीत ते काजवेच सारे
काळ्या चिकट कागदाला रात्र समजले असतिल..

==================================

प्रभांगणी तारे
अंगणी प्राजक्त
मध्ये प्रचंड पो़कळी, आपला गंध आपल्या पाशी..

==================================

काही काजवे मुठीत धरावेत
काही भोकाच्या पेटीत बंद करावेत
तरी पहाट ती येणारच...

==================================

एक कोसळता तारा
इच्छा: वाचव रे त्याला
आणि काजवा उडू लागला...

==================================

सूर्य वाहतो तमाच्या पखाली
निशेचा मोर्चा, काजव्यांच्या मशाली
चंद्राने म्हणे बंद पुकारलाय...

==================================

काजव्यांची रात्र
चांदण्यांची रात्र
अवसेचा झगमगाट...

==================================

जुगनू म्हणजे काजवा ना रे?
काजवा म्हणजेच जुगनू
पण मला जुगनूच आवडतं....

==================================

-सत्यजित.

Wednesday, March 14, 2012

कागदाची चिता

माझी पत्र अजुन का
ठेवली असशील जपून
तुझा चेहरा बोलका होता
कुठवर ठेवशील लपून

कगदाचं काय येवढं
आठवणींच लख्तरं होईल
शाई उडुन जाता जाता
तिच देखिल अत्तर होईल

जर ठेवायची असतील जपुन
तर उत्तरांची तयारी कर
माझ्या पर्यंत प्रश्न पोहचतील
येवढं आत्ताच गृहीत धर

बघ त्या पत्रांतून मला
वगळता येतं का?
त्या पत्रांची चिता रचून
मला जाळता येतं का?

तुझ्या हातानी पाणी नाही
पण अग्नी तरी मिळेल
प्रत्येक पत्र जळताना
तुझे अशृ पाहून उजळेल.

-सत्यजित.

Saturday, March 10, 2012

वाद्यवृंद - बालकविता Audio स्वरुपात :)

वाद्यवृंद - विविधतेत एकता म्हणजेच Unity in Diversity

पेटी म्हणते सा रे ग
तबला म्हणतो धाक धिक ध
शिळ घाले बासुरी अन
ढोल म्हणतो धडाम ध

धुम तना धिंदिंत ननाना
धुम तना धिंदिंत ननाना
धुम तना धिंना धिना

गिटार म्हणतं डिंग डींग डिंग
मेंडॉलीनची टींग टींग टींग
वायोलिन करे कूईं-कूईं कुई-कुई
तान घेते सतार गं

टींन टींन टिडी टीडी टिडी टीडी टींन
टींन टींन टिडी टीडी टिडी टीडी टींन

पैंजण करती छन छन छन
टाळ करती खण खण खण
घुंगरांची रुणझूण चाले
ताशा वाजे ढडाम ढं

ढींकचिका ढींकचिका ढींकचिका ढींकचिका
ए.. ए.. ए... ए.. ए.. ए.. ए... ए..

ट्रंपेट काढतो रे भोंगा
सेक्साफोनचा रे दंगा
शेहनाई ती सुरात गाते
नादस्वरम करे पॅप्याप प
पॅपॅप प्यां पॅपॅप प्या पॅपॅप प्या पॅपॅप प्या..
पॅपॅप प्यां पॅपॅप प्या पॅपॅप प्या पॅपॅप प्या..

ना एक सारखे जरी दिसती
ना एक सारखे स्वर देती
सुरां मध्ये सुर गुंफता
करती मग ते कंमाल रं
ढीपाडी डिपांग, डिचीपाडी डिपांग,
हेढीपाडी, डिचीपाडी, डिपांग कु...डु....

एक होऊनी गाऊया
धुंद होऊनी नाचूया
गोंगाट मस्ती कल्ला दंगा
चला करुया धामल हो

हम मैं है हीरो (2)
हम मैं हैं हीरो .. ओ ओ ओ ओ ...
हम हीं हैं हीरो.... आम्ही तर हीरो....

-सात्यजित

हे गाणं वाचण्यापेक्षा ऐकण्यात जास्त धमाल येईल. हे गाणं इथे ऐकता येईल


किंवा ईथे क्लिक करा

मी काही गायक नाही, तेंव्हा एका दमात गाणं म्हणताना माझी बरीच दमछाक झाली. मी प्रथमच ध्वनीरूपात सादर करतोय, त्यामुळे चुकांबद्द्ल क्षमस्व.

बच्चापार्टी तुम्हाला. हे गाणं कसं वाटल नक्की कळवा...

Monday, March 5, 2012

अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा...

थांबा बसू नका
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

बाबा पाय दुखले
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

थांब उचलून घेतो हं,
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

बाबा चला ना...
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

बसलात काय?
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

दोघांना उचलून नाही हां जमणार..
अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा
१, २, ३, ४

अजुन चार पावलांवर आहे विश्राम थांबा...

-सत्यजित.

Sunday, February 5, 2012

फुले कागदी दरवळती

तू माळल्या गजर्‍यातल्या
दोन कळ्या सांडल्या
मी द्याव्या तुला म्हंटल तर
त्याही खुळ्या भांडल्या

प्लिज नको ना देऊस
आम्हा तिथे मोल नाही
पण तुम्ही फुलाल इथे
तितकी इथे ओल नाही

हिरमुसल्या बिचार्‍या
मग मलाही मन मोडवेना
निष्पर्ण वहीच्या पानात फुललं
मलाही फूल तोडवेना

जुन्या वहीच्या पानात
अजुनही गंध दरवळतो
घमघमता वेणीतला गजरा
निष्पर्ण वहीवर जळफळतो

ह्या वहीच्या पानांची
सुंदर फुले करीन म्हणतो
"कागदी फुलं गंधहीन"
सांगा असं कोण म्हणतो?

-सत्यजित.

डाव रडीचा

तू माझा एक प्यादी मारलास
मी रडलो चिडलो डाव उधळून दिला
तू तो डाव तसाच लावलास,
माझी खेळी खेळलास, डाव जिंकून दिलास...

Big cheater you are...

Sunday, January 29, 2012

Ifs 'n Buts

अयुष्यात जर-तर,
असायला नको खरतर
जर नसता, तर नसता
सुख असतं खरोखर

जर असं झालं
तर असं होईल
जर तसं झालं
तर कसं होईल?

जर असं झालं तर?
काढुन ठेवा विमा
जर लॉटरी लागली तर?
सुखाला ना सीमा

देवा देवा असं कर
देवा देवा तसं कर
देवा केलस असं तर
देवा केलस तसं तर

जर-तरनी तर
वाट लावलिय पूरी
आजच्या जगण्याला
उद्याची सुरी

एक जर सुखाचा
शंभर तर दु:खाचे
एक जर मौलाचा
शंभर तर फुकाचे

-सत्यजित.