Monday, June 15, 2020

मंथन

विचार करायला नाही वेळ घडवून आणायचीय क्रांती आता
मिळणार नाही बऱ्या बोलानी बडवून आणायचीया क्रांती आता
तख्त बदलायचं देशाचं अरक्षणावरून मोर्चा काढायचंय
धर्मावरून लाखोली वाहायचीय जातीवरून वचपा काढायचंय
टीव्ही वरच्या बातम्या पाहून पेटून उठते अशी आग
कुणी केलं माहीत नाही शेजाऱ्यावर काढायचा राग
कोण कसले मित्र आणि कोण कुठले शेजारी
आधी माझा धर्म खरा आधी त्यांची जात खरी
प्रत्येकजण ग्रासलेला आणि प्रत्येकजण त्रासलेला
प्रत्येकजण माजलेला तरी प्रत्येकजण मागासलेला
मागासलेपण मिरवण्यात आता खरं आहे भूषण
मदत करायला गेलात तर सबळ म्हणून देतील दूषण
संभाजीच्या शिवाजीच्या विड्या फुकुन काढायचा धूर
भिमाच चाक चिखलात बोंबालत राहायचं आला पूर
आधीच छाटल्या शेंडीला चोळून ठेवायचं मणभर तूप
आग पेटवायची म्हणून फकीर जळतोय मूठभर धूप
पुजारी झालेत नेते देवाला ठेवलाय करायला प्रचार
एकाला चढवलाय सुळावर एकाला वनवासी पाचर
आता नेता सांगेल तीच आई नेता सांगेल तोच बाप
आता नेता सांगेल कोण तुम्ही नेता सांगेल कुणाचं पाप
VR गॉगल देऊन त्यांनी केलेत तुमचे उघडे डोळे
एवढं भयंकर आहे सगळं? तुमच्या पोटात तोफेचे गोळे
ते गोळे डागायला तुम्ही जन्माला घालता एक तोफ
मायेने पोसणाऱ्या आईच्या हृदयाला पाडते रोज भोक
हे जे बाळ आहे तुमचं तेही हळू हळू मोठं होईल
प्रेमाने पोसणाऱ्या आईला एक दिवस उडवून देईल
पोरके व्हाल पुन्हा तेंव्हा ते तोफा घालतील मुशीत
पुन्हा बाहेरचे येतील आणि राज्य करतील खुशीत

- सत्यजित








No comments:

Post a Comment