Monday, June 8, 2020

क्लासमेट्स


स्वप्नांची ना धेय्यांची
ऱ्हासांची ना त्रासांची
स्वतःची जेंव्हा स्वतःशी
झाली नव्हती भेट

अगदी तेंव्हाचे
अगदी  तेंव्हा पासून...
आम्ही जिगरी बिगरी मेट
आम्ही क्लासमेट्स ...
आम्ही क्लासमेट्स

शाळेच्या पहिल्या दिवशी
एक पिल्लू बावरलेल
अगदी आईच्या मायेने
बाईंनी गोंजारलेलं

ओळख बोबड्या बोलांची
त्या लुकलुकत्या डोळ्यांची
न मागता मिळालेली
ही पहिली वहिली भेट

अगदी  तेंव्हाचे ...

इतके होतो कोवळे
जसा नुकता फुटला कोंब
इतके होतो हळवे
पावसाचा पहिला थेंब

ना लपून छपून
ना अडून दडून
जेंव्हा मित्रांना मनातलं
सांगत होतो थेट

अगदी  तेंव्हाचे...

शाळेच्या बाकावरती
ठेका धरली गाणी
शाळेच्या नळा वरती
ओंजळीने प्यायलो पाणी

ना बुटाचे ना सुटाचे
ना हायजीनचे
ना डायजीनचे
जेंव्हा नव्हते नसते पेच

अगदी तेंव्हाचे...

शाळा सुटल्यावरती
रेंगाळायचो तासंतास
ना करिअरचे टेंशन
ना ट्राफिकचा त्रास

खेळायचो हसायचो
खरे खरे जगायचो
जेंव्हा प्रत्येक गोष्टीवरती
लिहिले नव्हते रेट

अगदी  तेंव्हाचे...

कुणी टारगट टक्के टोणगे
कुणी नाजूक तर कुणी दांडगे
कुणी उगाच घाबरणारे
कुणी मार खाऊन हसणारे

हळवे होऊन रडलो
तावातावाने भांडलो
कधी दणादण कधी रडारड
पण दोस्ती होती सेट

अगदी  तेंव्हाचे ...

नकळत कळतेपणाला
हलकेच आली जाग
अल्लड कोवळ्या कळ्यांचे
हुल्लड भुंगे घेती माग

सांगून ही ना कळले
कधी न सांगता ओळखले
ती कोवळ्या मनात
जपलेली कोवळी सिक्रेटस

अगदी  तेंव्हाचे....

आजही मजला तुम्ही
युनिफॉर्म मधले दिसता
व्हाट्सऍपवर दंगा करताना
वर्गात जाउनी बसता

स्मृतींचा पसरे गंध
भेटीचा जडला छंद
आपल्यात दडलं बालपण
आज पुन्हा देणार भेट

अगदी आत्ताचे
अगदी आत्ता पासून...
 करतो आहोत wait


अगदी तेंव्हाचे
अगदी  तेंव्हा पासून...
आम्ही जिगरी बिगरी मेट
आम्ही क्लासमेट्स ...
आम्ही क्लासमेट्स

No comments:

Post a Comment